कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या शिल्प चित्रकारांच्या कलाकृतींची पाहणी
कोल्हापूर :
शिल्प- चित्र कलाकारांनी मौनी महाराज मठ परिसरातील ऐतिहासिक वास्तू कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘पर्यटन दिनी’ राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस येथे भरविण्यात आले. या प्रदर्शनास आमदार ऋतुराज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी. टी. शिर्के, अभिनेते आनंद काळे, डॉ जय सामंत, अनंत खासबारदार, उदय गायकवाड, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर, विनोद कांबोज, प्राचार्य अजय दळवी, वास्तू विशारद अमरजा निंबाळकर, उत्तम कांबळे, उदय सुर्वे यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक पर्यटन दिना निमित्ताने सुरू असणाऱ्या पर्यटन सप्ताहात पाटगाव येथील श्री मौनी मठ येथे आयोजित कला कार्यशाळेमध्ये कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या एकूण तेरा चित्र – शिल्पकारांनी आपली कला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार प्रकाश आबिटकर, साहित्यिक राजन गवस, प्राचार्य अजेय दळवी व मान्यवरांच्या समक्ष उत्स्फूर्तपणे सादर केली होती. या कला उत्सवामध्ये चित्रकार विजय टिपूगडे, प्रशांत जाधव, मनोज दरेकर, दीपक कांबळे, नागेश हंकारे, बबन माने, अभिजित कांबळे, मनिपद्म हर्षवर्धन, आरिफ तांबोळी, विवेक कवाळे, आकाश मोरे, वैभव पाटील आणि शिल्पकार सत्यजित निगवेकर यांनी सहभाग घेतला.
पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक बाबी जिल्ह्यात आहेत. येथील कलाकारांच्या चित्रांचे सौंदर्य जिल्ह्यासह देशभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. भुदरगड तालुक्यातील पाटगाव मधील मौनी महाराज मठ, भद्रकाली मंदिर यासह जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताहांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम वर्षभर सुरु राहण्यासाठी नियोजन करु, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले.
पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचा शिल्प व चित्र कलाकारांचा संघ तयार करुन राज्यपातळीवरील विविध महोत्सवात या कलाकारांना सहभागी होण्याची संधी मिळवून द्यायला हवी, जेणेकरून हे कलाकार कोल्हापूर जिल्ह्याचे निसर्ग वैभव चित्र, शिल्प कलेच्या माध्यमातून देश विदेशात पोहोचवण्याचं काम करतील.